नसरापूर प्रकरण: राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

नसरापूर प्रकरण: राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. सदर प्रकरणावर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं, असं राज ठाकरे म्हणाले. 

सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्टटट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच पण अशा घटना वारंवार का घडत आहेत? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो, सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. दोनचार दिवसांत हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल यावर आपण कधी बोलणार आहोत का? या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे, महाराष्ट्राचं 'लक्ष' आणि 'लक्ष्य' विचलित झालं आहे आणि कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही. 'सत्ता' मिळवणे, ती गाजवणे याचा एक भस्मासुर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागला आहे त्याने महाराष्ट्र पूर्ण विस्कटायला लागला आहे. प्रत्येकाला या ना त्या मार्गाने सत्ता मिळवायची आहे आणि गाजवायची आहे.

राजकारण्यांना, काही उद्योगपतींना सत्ता हवी आहे. हल्ली लेखकांना पण साहित्य संमेलनाच्या मार्फत सत्ता गाजवायचा मोह होतो. अगदी एशियाटिक सारख्या संस्थेत सुद्धा सत्तेची लढाई पेटते, आणि एकूणच सत्तेच्यासाठी वाट्टेल ते याचं असं काही उदात्तीकरण होत आहे की हाच पुरुषार्थ वाटतो. जे वरती घडतं त्याचं प्रतिबिंब खाली उमटत असतं. अगदी दुबळा माणूस सुद्धा या सगळ्यात सैरभैर होऊन आपल्यापेक्षा दुबळ्यांच शोषण करतो. याकडे पूर्वी मोठ्यांचं लक्ष असायचं, कोणीतरी कोणाचे तरी कान उपटायचे. राजकारण्यांना पत्रकारांचा धाक होता, समाजात प्रत्येकाकडे कोणाचं तरी कोणाकडे लक्ष असायचं तेच हललं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.