गडहिंग्लज–नेसरी मार्गावरील भडगावचा पर्यायी पूल गेला वाहून; वाहतूक विस्कळीत!

गडहिंग्लज–नेसरी मार्गावरील भडगावचा पर्यायी पूल गेला वाहून; वाहतूक विस्कळीत!

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. या सततच्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. याच दरम्यान, गडहिंग्लज–नेसरी मार्गावरील भडगावजवळील पर्यायी पूल पावसाच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हा मुख्य पूल वाहून गेल्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक प्रशासनाकडून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नेसरी आणि परिसरातील गावांचा संपर्क यामुळे तात्पुरता तुटला आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, सध्या या मार्गावरील वाहतूक आजरा मार्गे पर्यायी रस्त्याने वळवण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाची गंभीर परिस्थिती पाहता, नागरिकांनी अत्यंत अत्यावश्यक काम नसल्यास या भागातील प्रवास टाळावा, तसेच नदीकाठच्या परिसरात जाताना खबरदारी बाळगावी आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.