एनआयटी कोल्हापूर येथे 'विद्युत सुरक्षा' कार्यशाळा संपन्न; महावितरणच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन!
कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त एनआयटी कोल्हापूरच्या इलेक्ट्रिकल विभागात विद्यार्थ्यांसाठी 'विद्युत सुरक्षा' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महावितरण आणि एनआयटी यांच्यातील शैक्षणिक करारांतर्गत ही कार्यशाळा पार पडली.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक व महावितरणचे डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर रोहित कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विजेचा शॉक लागल्यास करायचे प्राथमिक उपचार, शॉर्टसर्किट, वीज चोरी व गळती टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच औद्योगिक व घरगुती वायरिंग आणि अर्थिंगची नियमित तपासणी करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी महावितरणतर्फे विद्युत सुरक्षेची शपथही घेण्यात आली.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या सौरऊर्जा योजना, ऊर्जा बचत आणि ऊर्जा क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधींबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रकाश काकडे, संदीप काकडे, सचिन दळवी आणि एनआयटीचे प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.




