"हिंदुस्थानी भाऊचा मोठा दावा; उद्धव ठाकरेंना इशारा, संजय राऊतांवरही निशाणा"

"हिंदुस्थानी भाऊचा मोठा दावा; उद्धव ठाकरेंना इशारा, संजय राऊतांवरही निशाणा"

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं असून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि 'बिग बॉस' फेम हिंदुस्थानी भाऊ यांनी एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये त्यांनी येत्या 7 सप्टेंबरपर्यंत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असा दावा केला. तसेच ठाकरे गटातील काही आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, या दाव्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हिंदुस्थानी भाऊ यांनी व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांना उद्देशून, "सांभाळा, नाहीतर अजून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडतील. 7 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा," असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.याच व्हिडिओमध्ये त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांच्यावर वैयक्तिक शब्दांत निशाणा साधत विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

दरम्यान, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दान गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर ठाकरे गटाने 'रामरक्षा आंदोलन' सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. तसेच आगामी काळात नागपुरातही आंदोलन करण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची माहिती आहे.हिंदुस्थानी भाऊ यांच्या व्हिडिओतील दावे आणि आरोप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या राजकीय दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.