प्रशांत किशोरांचा भाजपच्या अभेद्य गडाला धक्का? बांकीपूर पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीपासून आघाडी
मुंबई (प्रतिनिधी) : पाटणा येथील बांकीपूर पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या फेरीत जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीनंतर ते 862 मतांनी पुढे आहेत. भाजपचे नीरज सिन्हा 1,363 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर आरजेडीच्या रेखा गुप्ता मागे पडल्या असून त्यांना दोन फेऱ्यांमध्ये 505 मते मिळाली आहेत.

ए.एन. कॉलेजमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली, त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू झाली. 14 टेबलांवर 31 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ड्रोनद्वारेही मतमोजणीवर लक्ष ठेवले जात आहे.
या पोटनिवडणुकीत जनसुराजचे प्रशांत किशोर, भाजपचे नीरज सिन्हा आणि आरजेडीच्या रेखा गुप्ता यांच्यासह एकूण 25 उमेदवार रिंगणात आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपने विजयाची तयारी सुरू केली असून, पक्षाचे नेते कल्लू यांनी 200 किलो लाडूंची व्यवस्था केली आहे.
बांकीपूर मतदारसंघ गेली 30 वर्षे भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 1995 पासून ही जागा भाजपकडेच आहे. यापूर्वी नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि त्यानंतर त्यांचे पुत्र नितीन नवीन यांनी येथे सलग विजय मिळवला आहे. 2025 मध्ये आमदार म्हणून निवडून आलेले नितीन नवीन राज्यसभेत गेल्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली.
30 जुलै रोजी झालेल्या मतदानात केवळ 34.30 टक्के मतदान झाले. हे प्रमाण 2025 च्या विधानसभा निवडणुकीतील 41.39 टक्क्यांपेक्षा सुमारे 7 टक्क्यांनी कमी आहे. कमी मतदानामुळे सर्वच पक्षांचे अंदाज वेगवेगळे आहेत. भाजपने पारंपरिक मतदार कमी बाहेर पडल्याचे कारण दिले आहे, तर जनसुराजने याला बदलाची चाहूल असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, आरजेडीने त्यांच्या समर्थकांनी उत्साहाने मतदान केल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले. प्रशांत किशोर यांनी प्रशासनावर सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप करत, सुमारे 20 मतदान प्रतिनिधी आणि 50 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला. या मुद्द्यावरून जक्कनपूर पोलीस ठाण्यात त्यांचा पोलिसांशी वादही झाला.




