भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत ; विधान परिषदेच्या 10 जागांसाठी संपूर्ण यादी
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
भाजपकडून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा : माधवी नाईक,राजेश पांडे,रणजितसिंह निंबाळकर,राम सातपुते,संजय काका पाटील,संजय केणेकर,प्रज्ञा सातव,अर्चना पाटील चाकूरकर,दादाराव केचे,संजय भेंडे,संदीप जोशी,दयाशंकर तिवारी.
शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा : नीलम गोऱ्हे,रविंद्र फाटक,संजय मोरे,किरण पावसकर,शीतल म्हात्रे,शायना एनसी,दिपक सावंत,बच्चू कडू.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा : झिशान सिद्धिकी,उमेश पाटील,संजय दौंड,सुरेखा ठाकरे,आनंद परांजपे,सुरेश बिराजदार,राजेंद्र जैन.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा : उद्धव ठाकरे,अंबादास दानवे,सुषमा अंधारे,विनायक राऊत,राजन विचारे,वैभव नाईक,सूरज चव्हाण
विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार : उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा),नीलम गोऱ्हे (शिवसेना),शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट),अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट),गोपीचंद पडळकर (भाजप),रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप),राजेश राठोड (काँग्रेस),प्रवीण दटके (भाजप),रमेश कराड (भाजप)




