रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात? आजच नाव जाहीर होणार; गोगावलेंचा मोठा दावा

रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात? आजच नाव जाहीर होणार; गोगावलेंचा मोठा दावा

मुंबई (प्रतिनिधी) : महायुतीमध्ये ज्या मुद्द्यावरून तिढा निर्माण झाला आहे, त्या रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न आता सुटण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलं आहे मंत्री भरत गोगावले यांनी केलेलं एक ताजं वक्तव्य. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आजच संपणार असून संध्याकाळपर्यंत आपलं नाव जाहीर केलं जाणार असल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली. तसेच यंदाच्या 15 ऑगस्ट रोजी रायगडचा पालकमंत्री म्हणून आपणच ध्वजवंदन करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्यात महायुतीची सत्ता येऊन आता जवळपास पावणे दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यांच्यातील वादामुळेच आतापर्यंत या पदावर तोडगा निघू शकला नाही. मात्र, आता पालकमंत्रिपदाचा हा तिढा सुटला असल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला आहे.

भरत गोगावले म्हणाले की, रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा आज होणार असून आपलं नाव निश्चित करण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत चर्चा झाली आहे. त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत आपल्या नावाची पालकमंत्री म्हणून घोषणा केली जाणार आहे. यंदाच्या 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा मान आपल्यालाच मिळणार असून पालकमंत्री म्हणून आपणच ध्वजारोहण करणार असल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला.

महायुती म्हणून राज्याच्या सत्तेत एकत्रित असले तरी रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विस्तवही जात नसल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना नेत्यांमधील वाद हा रायगडच्या राजकारणातील नेहमीचाच मुद्दा राहिला आहे. सुनील तटकरे यांनी आपली कन्या आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या जिल्ह्यातील तीनही आमदारांनी हे पद आपल्याकडेच राहावं, यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.

या सगळ्या घडामोडींमुळे रायगडमध्ये सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकारण प्रत्येक टप्प्यावर वेगळं वळण घेताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी राज्यातील विधान परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे आमदार झाले. मात्र, त्याआधी ही जागा आपल्यालाच मिळावी आणि आपलेच मतदार सर्वाधिक असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता.

मात्र, वरिष्ठ स्तरावर झालेल्या तडजोडीनंतर शिवसेनेने माघार घेतली आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा केला. मात्र, या आमदारकीच्या बदल्यात रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी तटकरे यांनी तडजोड केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.

या सगळ्या घडामोडींनंतर आता भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी गोगावले यांच्या दाव्यामध्ये किती सत्यता आहे, हे काही वेळात स्पष्ट होणार आहे.तसंच, जर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झाला असेल, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.