मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य; 30 वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय, चिठ्ठीतील ‘ते’ शब्द मन हेलावणारे

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य; 30 वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय, चिठ्ठीतील ‘ते’ शब्द मन हेलावणारे

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून एका 30 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आपले जीवन संपवल्याची सुन्न करणारी घटना समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोसी येथे हा धक्कादायक प्रकार घडला. गणेश आश्रोबा ठोंबरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे हे राहत्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच बामणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी तसेच रुग्णालयात पोहोचून प्राथमिक पंचनामा केला. यावेळी पोलिसांना गणेश यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. "मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहोत, सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा," अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गणेश ठोंबरे यांचे चुलत भाऊ आणि पंचायत समिती सदस्य भास्करराव ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हे मागील दोन-तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून तीव्र नाराजी व्यक्त करत होते. या मुद्द्यावरून ते प्रचंड मानसिक तणावात असल्याचेही नातेवाइकांनी सांगितले. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले आहे.

मृत गणेश ठोंबरे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने प्रशासन आणि सरकारने त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी तसेच आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भास्करराव ठोंबरे यांनी केली आहे.

या घटनेची बामणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार ठाकूर करत आहेत. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे भोसी गावावर शोककळा पसरली आहे.