पुण्यात पुन्हा खंडणीचा धक्का! व्यापाऱ्याला 2 कोटींची धमकी; आठवडाभरात तिसरी घटना
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यात पुन्हा एकदा व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तमनगर परिसरातील एका व्यापाऱ्याकडे तब्बल 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, ही गेल्या एका आठवड्यातील तिसरी अशी घटना असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी इंटरनेट कॉलद्वारे संबंधित व्यापाऱ्याशी संपर्क साधण्यात आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख शुभम लोणकर अशी करून दिली. तक्रारदार हे उत्तमनगर-शिवणे मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी असल्याचा उल्लेख करत त्यांच्या बांधकाम व्यवसायाची, कारच्या नोंदणी क्रमांकाची तसेच दैनंदिन हालचालींची माहिती असल्याचा दावा करण्यात आला.
यावेळी कुटुंबातील सदस्यांची माहिती असल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर 2 कोटी रुपये तयार ठेवण्यास सांगून पुढील सूचना लवकरच दिल्या जातील, असा इशाराही देण्यात आला. या प्रकरणानंतर व्यापाऱ्याने तत्काळ उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
यापूर्वी 22 जून रोजी वानवडी परिसरातील एका स्टील उद्योगपतीकडे 50 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर मांतरवाडी येथील त्यांच्या कारखान्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. तसेच 23 जून रोजी वडकी येथील एका औषध घाऊक विक्रेत्याकडेही 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
दरम्यान, सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पुण्यातील व्यापारी वर्गात चिंता वाढली असून, या धमक्यांमागे नेमके कोण आहे याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.




