बीडच्या गोदावरी नदीत बोट उलटली; साडी अडकली, “स्वामी समर्थ'' म्हणत महिलांचा अंगावर काटा आणणारा अनुभव

बीडच्या गोदावरी नदीत बोट उलटली; साडी अडकली, “स्वामी समर्थ'' म्हणत महिलांचा अंगावर काटा आणणारा अनुभव

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदीत बोट उलटल्याची घटना आज घडली. नदीकाठाजवळच बोट पलटल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि अनेक भाविकांचा जीव वाचला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य केले आणि पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत घेतल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्रवाशांनी सांगितले. या घटनेनंतर चार ते पाच जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच याच परिसरात नदीत पोहायला गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता.

अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम पुरी येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असताना, प्रशासनाकडून पुरेशा सुविधा नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बोटीत 50 पेक्षा जास्त लोक बसवण्यात आल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे. काही महिलांनी बोटीतून उतरायचा प्रयत्न केला असता त्यांना थांबवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील महादेव घाट येथेही अशीच दुर्दैवी घटना घडली. कन्हान नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुण आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने मृतदेह बाहेर काढून पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठवले.