भाजपमध्येच अंतर्गत विरोधक; सत्तेचं राजकारण एक दिवस उलटणार-राज ठाकरेंचा घणाघात

मुंबई (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, इतिहास सांगतो की जेव्हा सत्ताधारी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्याच पक्षात नवे विरोधक तयार होतात आणि अखेर तेच सत्ता उलथवतात. ही प्रक्रिया आता भाजपमध्ये सुरू झाली असल्याचा दावा त्यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात सध्या सुरू असलेलं राजकारण घाणेरडं आणि फोडाफोडीचं आहे. आमदार-खासदारांच्या पक्षांतरावर बोलताना त्यांनी टोला लगावला की, "प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकले जाणाऱ्यांचा आहे."त्यांनी अमित शहा यांच्या राजकारणावरही निशाणा साधत, शिवसेना आणि टीएमसीतील फुटीचा उल्लेख केला. तसेच, भाजपचं सध्याचं राजकारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच टिकून असल्याचा दावा करत, "मोदींचा आधार ढासळला तर संपूर्ण रचना कोलमडू शकते," असे ते म्हणाले.

एसआयआर आणि मतदार यादीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पश्चिम बंगाल आणि बिहारमधील लाखो मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला. तर मुंबई आणि ठाण्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शहर नियोजनावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले.राज ठाकरे यांनी आरोप केला की, महाराष्ट्रात सध्या विकासापेक्षा बिल्डरधार्जिणे धोरण आणि राजकीय फोडाफोडीलाच अधिक प्राधान्य दिले जात असून, याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.