दिल्लीत मोठ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा! श्रीकांत शिंदे-ओमराजे निंबाळकरांना संधी?
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीत लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रीय पातळीवरील राजकीय महत्त्व वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रीपदासह आणखी एक राज्यमंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू असून, हे दोघे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातही काही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीट (NEET) परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात किंवा मंत्रिमंडळात बदल होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याबाबतही फेरबदलाच्या चर्चा सुरू आहेत. आगामी निवडणुका आणि राजकीय समीकरणे लक्षात घेऊन काही कनिष्ठ मंत्र्यांमध्येही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.याचबरोबर आणखी एक मोठी चर्चा म्हणजे अर्थमंत्रीपदाबाबत. सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती समोर येत आहे की, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या खात्यात बदल झाल्यास शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, अशीही चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे.




