सचिन अहिरनंतर आता सुनील शिंदे? ठाकरेंच्या आणखी एका आमदाराबाबत राजकीय हालचालींना वेग
मुंबई (प्रतिनिधी) : सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशानंतर आता ठाकरे गटाच्या आणखी एका विधान परिषद आमदाराबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार सुनील शिंदे यांना शिंदे शिवसेनेत आणण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.सध्या ठाकरे गटाकडे विधान परिषदेतील पाच आमदार आहेत. त्यापैकी सुनील शिंदे हे 2021 मध्ये तत्कालीन एकसंघ शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते. याच मुद्द्याचा आधार घेत शिंदे गट त्यांच्याशी संपर्क साधत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

याआधी सचिन अहिर हे 2022 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर विधान परिषदेत निवडून आले होते. नंतर त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत ठाकरे गटासमोर काही अडचणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच धर्तीवर सुनील शिंदे यांच्याबाबतही रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे.
सुनील शिंदे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ 2027 पर्यंत आहे. त्यामुळे त्यांना आपल्या गटात सामील करून घेण्याचा प्रयत्न शिंदे शिवसेनेकडून सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेषतः वरळीतील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.दरम्यान, सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर विधान परिषद उपसभापतीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे जाऊ शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर सुनील शिंदे यांनीही प्रतिक्रिया देताना पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली होती. "सचिन अहिर यांच्या हालचालींची मला कल्पना होती. मात्र मी एक छोटा कार्यकर्ता असल्याने त्यावर सार्वजनिक भाष्य करू शकलो नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती.मात्र, सुनील शिंदे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.




