सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना रंगणार; दोन्ही राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी
पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर पडदा पडला असला, तरी आता बारामती तालुक्यात पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार आहे. निमित्त ठरले आहे ते बारामती तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे. सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गटांनी आपले स्वतंत्र पॅनेल उभे करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

युगेंद्र पवार आणि सुनेत्रा पवारांची मोर्चेबांधणी
काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी चर्चेतून मार्ग काढून ही निवडणूक एकत्र लढवण्याची भूमिका मांडली होती. मात्र, प्रत्यक्षात तशी कोणतीही राजकीय चर्चा पुढे आलेली नाही. अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय सहकार क्षेत्रातील या मोठ्या निवडणुकीत आमनेसामने ठाकले आहेत. शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी सोमेश्वर कारखान्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनीही आपल्या बाजूच्या इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेत निवडणुकीची तयारी वेगात सुरू केली आहे. दोन्ही गटांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचीही स्वतंत्र तयारी
दुसरीकडे, या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनीदेखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या गटासोबत भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाने युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा केलेली नाही. त्यामुळे अजित पवार गट हा कारखाना मित्रपक्षांसोबत लढवणार की स्वतंत्रपणे उतरणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. असे असले तरी, युती झाली नाही तर स्वतंत्र पॅनेल उभे करून लढण्याची तयारी भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
३० सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
येत्या ३० सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या मुदतीपूर्वी चर्चेतून काही तोडगा निघून ही निवडणूक बिनविरोध होते का, की बारामतीत जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ३० सप्टेंबर रोजीच या निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.




