लाडकी बहीण योजनेचा 16 वा हप्ता लवकरच ; ई - केवायसी प्रक्रियेत बदल - मंत्री आदिती तटकरे
मुंबई - महाराष्ट्र सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा सोळावा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी ई - केवायसी करणं अनिवार्य आहे. ई-केवायसी करताना अनेक महिलांना येणाऱ्या अडचणींवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं की, सध्या योजनेच्या अधिकृत वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल सुरू असल्याने ई - केवायसी प्रक्रियेत थोडा विलंब होत आहे. विशेषतः ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांच्यासाठी वेबसाइटवर विशेष पर्याय आणि बदल करण्यात येत आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन मंत्री तटकरे यांनी दिलं आहे.

मंत्री तटकरे म्हणाल्या, वेबसाईटवरील बदल पूर्ण झाल्यावर ई-केवायसी करणं अधिक सोपं होईल. सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ नक्की मिळेल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता. आता दिवाळीपूर्वी पुढील हप्ता मिळण्याची अपेक्षा असतानाच अनेक महिलांना ई-केवायसी करताना सर्व्हर डाऊन, ओटीपी न मिळणे अशा समस्या जाणवत होत्या.
वेबसाईटमध्ये सुरू असलेल्या बदलांमुळे वेळ लागत आहे, पण ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असा विश्वाही मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई - केवायसी करणं बंधनकारक असून, ई - केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी या मुदतीपूर्वी ई - केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.




