कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी ; उमेदवारांची दमछाक
कुरुंदवाड - कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन प्रणालीमुळे उमेदवारांची अक्षरशः दमछाक होत आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होणे, डेटा सेव्ह न होणे, अर्ज सबमिट करताना एरर दाखवणे अशा तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अत्यंत मर्यादित मुदतीत अर्ज दाखल करायचे असल्याने उमेदवारांकडून शासकीय कार्यालये आणि सायबर कॅफेमध्ये मोठी धावपळ सुरू आहे. प्रणाली सुरू होताच काही सेकंदांतच सर्व्हर हँग होणे, दस्तऐवज अपलोड न होणे आणि फॉर्म स्वीकारले न जाणे यामुळे उमेदवारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.याच पार्श्वभूमीवर काही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित प्राधिकरणांकडे तोंडी आणि लेखी स्वरूपात तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र, अद्याप समस्येवर ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे नागरिक व उमेदवारांचे म्हणणे आहे.
शहरातील सायबर कॅफे आणि ऑनलाईन सेवा केंद्रांमध्ये दिवसभर उमेदवारांची गर्दी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अर्ज अपलोड न झाल्याने उमेदवारांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक, मानसिक आणि वेळेचा ताण सहन करावा लागत आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार आणि नागरिकांकडून शासनाने तात्काळ पर्यायी उपाययोजना कराव्यात, ऑनलाईन प्रणाली अधिक सक्षम व स्थिर करावी, तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी तांत्रिक त्रुटींवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.




