भविष्यातील तंत्रज्ञान सहकार्यासाठी केआयटी यु.डब्ल्यू.ए.चा ‘मेजर स्ट्रॅटेजिक पार्टनर’ : डॉ. अमित चकमा
कोल्हापूर: कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय (प्रदत्त स्वायत्त) आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) यांच्यातील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याबाबत नुकतीच अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी चर्चा पार पडली. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे कुलगुरू डॉ. अमित चकमा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केआयटी महाविद्यालयाला भेट देऊन संस्थेच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि नवोपक्रमात्मक उपक्रमांची माहिती घेतली.

केआयटीसोबत धोरणात्मक भागीदारीत स्वारस्य
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. अमित चकमा यांनी केआयटीच्या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, "केआयटी आणि यु.डब्ल्यू.ए. यांच्यातील औद्योगिक अभिमुखता तसेच सांस्कृतिक व वैचारिक साम्यामुळे हे सहकार्य विशेष महत्त्वाचे आहे. भविष्यातील तंत्रज्ञान विकासासाठी केआयटीला एक प्रमुख धोरणात्मक भागीदार (Major Strategic Partner) म्हणून विकसित करण्यास आम्हाला स्वारस्य आहे." तसेच भारत आणि ऑस्ट्रेलियामधील शैक्षणिक संबंध दृढ करण्यासाठी ही संस्थात्मक भागीदारी महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक संधी
विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी, संयुक्त संशोधन आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव मिळवून देण्यासाठी भविष्यात व्यापक सहकार्य केले जाईल, अशी भूमिका संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी व्यक्त केली. केआयटीमध्ये प्रस्तावित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन इमर्जिंग टेक्नॉलॉजी’ हे विद्यार्थ्यांसाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाचे व्यासपीठ ठरणार असून, यामुळे जागतिक स्तरावर सक्षम अभियंते घडण्यास मदत होईल.
केआयटीची जागतिक झेप
संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केआयटीची शैक्षणिक वाटचाल, संशोधन आणि भविष्यातील विकास आराखड्याची माहिती देताना, केआयटीच्या आंतरराष्ट्रीय भागीदारीचा विस्तार आता युरोप आणि ऑस्ट्रेलियापर्यंत होत असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय संबंध अधिष्ठाता डॉ. रोहन नलावडे यांनी कोल्हापूरमधील संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट लाभणे ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीस संस्थेचे सचिव दीपक चौगुले, आंतरराष्ट्रीय संबंध अधिष्ठाता डॉ. रोहन नलावडे, तसेच मीना चकमा, प्रणव देसाई – प्रकल्प अधिकारी, यु.डब्लू.ए. आणि डॉ. कलिथा चेरीयन – वरिष्ठ व्यवस्थापक, शैक्षणिक भागीदारी यु.डब्लू.ए. यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.




