...तर राज्यात दुष्काळच पडला नसता"; शरद पवारांच्या दौऱ्यावर मंत्री जयकुमार गोरेंची उपरोधिक टीका

...तर राज्यात दुष्काळच पडला नसता"; शरद पवारांच्या दौऱ्यावर मंत्री जयकुमार गोरेंची उपरोधिक टीका

सोलापूर: राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, खरीप हंगाम धोक्यात आला आहे. राज्यातील सर्वात कमी पाऊस सोलापूर जिल्ह्यात झाला असून, काही शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फेरल्याचे गंभीर चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दुष्काळ टंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री गोरेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दुष्काळ दौऱ्यावर उपहासात्मक टीका केली.

 

शरद पवारांच्या दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा टोला
राज्यात दुष्काळ परिस्थिती पाहणी संदर्भातील शरद पवारांच्या २८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यामुळे सरकारला काही फायदा होईल का? असा प्रश्न जयकुमार गोरेंना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "अशा अनुभवाने जर फायदा झाला असता, तर राज्यात दुष्काळच पडला नसता." तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सध्या अनेक कामे होत असून ही कामे आधी झाली असती तर दुष्काळ परिस्थिती आली नसती, असे म्हणत त्यांनी मागील परिस्थितीला जबाबदार धरले.

मोहिते पाटील आणि रोहित पवारांना प्रत्युत्तर
धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गोरे म्हणाले की, "माझ्या मतदारसंघात टँकर सुरू आहेत, त्याकडे माझे लक्ष आहे, पण तुम्हीसुद्धा त्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात, कधीतरी त्या भागाचा दौरा करावा." तसेच, "उसणं प्रेम कशाला आणायचं? ज्यांनी अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवली ते बोलत आहेत," असे म्हणत त्यांनी रोहित पवारांनाही लक्ष्य केले.

सोलापुरात ८० टक्के पिकांचे नुकसान - पालकमंत्री गोरे
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देताना मंत्री गोरे म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्केच पाऊस पडला असून ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील १५ दिवसांत पाऊस न झाल्यास पिकांचे १०० टक्के नुकसान होईल. १५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस अपेक्षित असला, तरी त्याची वाट न बघता प्रशासनाला तातडीने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. उजनी धरण भरले असले तरी ६८ गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे एका वर्षाचे पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन सुरू आहे.

शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फिरवू नये - आवाहन
दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांवर बोलताना गोरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या नियमानुसार ५ ऑक्टोबर ही तारीख परतीच्या पावसाला लक्षात घेऊन ठरवली आहे, त्यामुळे त्यापूर्वी नियमानुसार दुष्काळ जाहीर करता येत नाही. तसेच, पंचनामे होईपर्यंत शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फिरवू नये, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले