पडळकर यांनी माफी मागावी अन्यथा..; शरद पवार गट आक्रमक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पडळकर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा जनआक्रोश उफाळून येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

वाळवा तालुक्यातील कचेरी चौकात पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. यावेळी तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला अध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील आणि विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजयराव पाटील म्हणाले, “जयंत पाटील यांचं राजकारणातील योगदान आणि अनुभव अफाट आहे. त्यांच्या इतकी कारकीर्द नसलेल्या आमदाराने अशा प्रकारची टीका करणे खेदजनक आहे. पडळकर यांची पात्रता नसतानाही ते सातत्याने अपमानास्पद विधाने करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा वाचाळ आमदाराचा राजीनामा घ्यावा.”
महिला पदाधिकाऱ्यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया देत पडळकर यांना जाहीर माफी मागण्याची मागणी केली. "माफी न मागल्यास घराबाहेर पडू देणार नाही," असा इशारा त्यांनी दिला. “जिथे आहात तिथे येऊन बांगड्या भरवू,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की, पडळकर यांच्याकडून आ. जयंत पाटील यांच्यावर टीका करून जतमधील अभियंताच्या आत्महत्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न होत आहे. "या प्रकरणाची अजून चौकशी झाली नाही, गुन्हा दाखलही झालेला नाही," असे सांगून प्रशासनाच्या दुर्लक्षावरही नाराजी व्यक्त करण्यात आली.
माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे यांनीही पडळकरांच्या टीकेवर कठोर शब्दांत निषेध नोंदवला. "शिक्षकाचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या पडळकरांनी बिरोबाची खोटी शपथ घेतली. त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली असून, त्यांनी जयंत पाटील यांची माफी मागावी," अशी मागणी त्यांनी केली.




