भाषेची अट लादणे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का?; मराठी सक्तीवरून अखिलेश यादवांचा सवाल
मुंबई (प्रतिनिधी) : प्रत्येक राज्याच्या मातृभाषेचा आदर आणि संवर्धन केले पाहिजे, मात्र कोणत्याही भाषेचे राजकारण होऊ नये. त्यामुळे देशाच्या भाषिक आणि भावनिक एकतेमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली आहे. मुंबईत रिक्षाचालकांवर मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी इतर राज्यांनीही अशीच स्थानिक भाषेची सक्ती केली तर काय होईल, असा सवाल उपस्थित केला.

मुंबईत भाजपचे उत्तर भारतीय नेते आहेत का, की ते भ्रष्टाचारात अडकले आहेत? भाषिक ज्ञानाची अशी अट लादणे हे देशभर व्यवसाय करण्याच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? असा प्रश्नही अखिलेश यादव यांनी उपस्थित केला. जर अशी अट असेल, तर मुंबईत कार्यरत असलेल्या परदेशी कंपन्यांनाही ती लागू केली पाहिजे, मात्र तसे होणार नाही, असा आरोप त्यांनी केला.
एकीकडे भाजप सरकार नोकऱ्या देत नाही, तर दुसरीकडे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. यामागे कमिशनचा खेळ आहे का, असा सवालही त्यांनी केला. मोठ्या ऑटो-रिक्षा कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी सर्वसामान्यांचे वाहन असलेल्या ऑटो-रिक्षांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, इतर राज्यांनीही राज्यात काम करण्यासाठी स्थानिक भाषेच्या ज्ञानाची अनिवार्य अट लागू केली तर काय होईल? प्रत्येकजण सुशिक्षित असेलच असे नाही आणि प्रत्येकाची भाषिक क्षमता एखादी भाषा पटकन शिकण्याइतकी असेलच असे नाही. ऑटो-रिक्षा चालक मानसिक दबावाखाली काम करत असतील, तर ते चालक आणि वाहन दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते.
जर अशीच भूमिका असेल, तर मुंबई-महाराष्ट्रातील भाजपने हिंदी, ब्रज, बुंदेली, अवधी, भोजपुरी, मैथिली, हरियाणवी, गढवाली-कुमायुनी, मारवाडी, गुजराती, काठियावाडी, सुरती यांसह देशातील विविध भाषा वापरणार नसल्याचे जाहीर करावे, असेही त्यांनी म्हटले.
तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया, सिंधी, पंजाबी, काश्मिरी, डोगरी, आसामी, मणिपुरी, मिझो, कोकबोरोक, खासी, गारो, बोडो, भिली, गोंडी, कुरुख, मुंडारी, संथाली यांसह इतर भाषांमधूनही मत मागणार नाहीत का, असा सवाल अखिलेश यादव यांनी केला. सरकारकडे मोठे हृदय आणि मोठा मेंदू, दोन्ही असायला हवेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.




