निलेश राणेंचा वैभव नाईकांवर जोरदार निशाणा; ‘शकुनी मामा मतदारसंघात नको’ म्हणत डिवचलं
मुंबई (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. आमदार निलेश राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकाची तुलना थेट ‘शकुनी मामा’शी केली.

मंत्रालयात विचारा, गेल्या दहा वर्षांत कुडाळ-मालवण मतदारसंघाची काय किंमत होती, असं म्हणत निलेश राणेंनी विरोधकांवर निशाणा साधला. सत्तेच्या कोणत्या बाजूला आहोत याचा विचार न करता मतदारसंघासाठी जे खरं आहे ते बोललो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी निलेश राणे म्हणाले की, ‘शकुनीने आयुष्य नकारात्मक विचारात घालवलं आणि प्रतिशोधाच्या भावनेतून काम केलं. त्यामुळे असा शकुनी आपल्या मतदारसंघात असता कामा नये,’ असं म्हणत त्यांनी वैभव नाईक यांच्यावर नाव न घेता टीका केली.
आपल्या कुटुंबालाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्याचा राग जनतेवर काढला नाही, असंही निलेश राणे यांनी सांगितलं. विरोधकांकडून दुसऱ्यांचं चांगलं होऊ नये, अशी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा महाभारतातील शकुनीचा संदर्भ दिला. निलेश राणेंच्या या वक्तव्यावर आता वैभव नाईक काय प्रतिक्रिया देतात, याकडे कुडाळ-मालवणच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.




