जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ जाणार नाही; विखे पाटलांचा स्पष्ट इशारा, ‘सरकार एक पाऊल पुढे आलंय’

जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ जाणार नाही; विखे पाटलांचा स्पष्ट इशारा, ‘सरकार एक पाऊल पुढे आलंय’

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. काल मध्यरात्री प्रसाद लाड, उदय सामंत आणि इतर मंत्र्यांनी फोनवरून जरांगे पाटलांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय उपचार पुन्हा सुरू केले. दरम्यान, आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता कोणतंही शिष्टमंडळ भेटीसाठी जाणार नसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

 जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असतील, तर तो त्यांचा निर्णय आहे. सरकारने आवश्यक ते निर्णय घेतले असून मराठा समाजाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं. सरकार एक पाऊल पुढे येत असेल, तर जरांगे पाटील यांनीही सरकारची भूमिका समजून घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकारकडे उपलब्ध असलेले सर्व पर्याय वापरून झाले आहेत, त्यामुळे आता पुढील मार्ग जरांगे पाटील यांनी ठरवावा, असंही विखे पाटील म्हणाले.

 मराठा आरक्षणाच्या नोंदींबाबत बोलताना त्यांनी 58 लाख नोंदी ग्रामपंचायतींकडे उपलब्ध करून दिल्याचा दावा केला. त्यातील अर्जांवर प्रक्रिया सुरू असून, वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पात्र लोकांना दाखले मिळतील, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रश्नात राजकारण न आणता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं महत्त्वाचं असल्याचं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. आता सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पुढची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.