राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी प्रकरणातील याचिका फेटाळली

राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी प्रकरणातील याचिका फेटाळली

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून धक्का बसला आहे. राहुल गांधींविरोधातील मानहानीचा खटला रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी 2018 मध्ये राजस्थानमधील एका सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दंडाधिकारी न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते.

 हे समन्स रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तक्रारदाराने कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा गटाला लक्ष्य केल्याचं स्पष्ट होत नसल्याने ही तक्रार कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्याचा युक्तिवाद राहुल गांधींच्या वतीने करण्यात आला.

 मात्र, भाजप हा नोंदणीकृत राष्ट्रीय राजकीय पक्ष असून ओळखता येण्याजोगा घटक असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळे तक्रार कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्याचा राहुल गांधींचा दावा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे राहुल गांधींविरोधातील मानहानीचा खटला सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.