'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर टोकाचे पाऊल
मुंबई (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करमोडा ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संग्रामपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपक उगले यांनी स्वतःच्या शेतात हे टोकाचे पाऊल उचलले. त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ तयार करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना आणि त्रासाला कंटाळून मी माझं जीवन संपवत आहे,' अशा आशयाचे वक्तव्य केल्याची माहिती आहे. या व्हिडीओनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दीपक उगले यांना नेमक्या कोणत्या व्यक्तींकडून धमक्या मिळाल्या होत्या, त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास दिला जात होता आणि या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. दीपक उगले यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी केलेला व्हिडीओ आणि त्यामध्ये करण्यात आलेले आरोप हे तपासातील महत्त्वाचे मुद्दे ठरण्याची शक्यता आहे.
दीपक प्रकाश उगले हे करमोडा ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच होते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी समोर येताच ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेमुळे संग्रामपूर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील नेमकी अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.




