'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री'; प्रवीण दरेकरांचा जरांगेंना पलटवार
मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नाशिकमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कुणबी प्रमाणपत्र, मराठा आरक्षण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरांगेंनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी प्रत्येकाने आपली मर्यादा लक्षात घेऊन बोलावे, असे म्हटले.

देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही एका व्यक्तीच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले नसून, राज्यातील अठरापगड जाती आणि बहुजन समाजाच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले, असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.दरेकर म्हणाले, "पुन्हा पुन्हा आक्रमक भूमिका घेणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, प्रत्येक विषय समजून घेणे महत्त्वाचे आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये एखादे प्रमाणपत्र अवैध ठरले असेल, तर मी म्हणतो म्हणून ते वैध करता येणार नाही. प्रमाणपत्र योग्य असेल तर संबंधितांनी शासकीय प्रक्रियेतून दाद मागावी."
ते पुढे म्हणाले, "जाणीवपूर्वक कोणाचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचे काम सरकार कधीही करणार नाही. देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विषयावर सकारात्मक आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. मात्र कोणाला राजकारण करायचे असेल तर तो त्यांचा विषय आहे. प्रमाणपत्राचा निर्णय सक्षम अधिकाऱ्यांकडून घेतला जातो."
मनोज जरांगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलताना दरेकर म्हणाले, "मनोज जरांगे यांनी समाजात फूट पाडण्यापेक्षा समाज जोडण्याचे काम करावे. समाजा-समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्यापेक्षा विकासासाठी प्रयत्न करावेत. चांगले काम करण्यासाठी मोठी विचारसरणी लागते.
ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करत आहेत. मनोज जरांगे यांचा सरकारने नेहमी सन्मान केला आहे. आंदोलनाच्या काळात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि निर्णय घेण्यात आले. आजही सरकार चर्चेसाठी तयार आहे, मात्र विषय समजून घेणे गरजेचे आहे."
एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता दरेकर म्हणाले की, "मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांचा विषय त्यांनी पाहावा, त्यावर मी भाष्य करणार नाही."देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेवर बोलताना दरेकर म्हणाले, "कोणालाही असे म्हणता येणार नाही की, माझ्या एकट्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. महायुतीला राज्यातील अठरापगड जाती आणि सर्व समाजाने मतदान केले आहे. अशा वक्तव्यांमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे आणि त्यानुसारच आपण बोलले पाहिजे."
मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी टोला लगावला. "देवेंद्रजींचे राजकारण कोणाच्या जीवावर चालते का? ते म्हणतील तेव्हा वर आणतील आणि ते म्हणतील तेव्हा खाली नेतील, अशी भूमिका योग्य नाही. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षाच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या ताकदीवर पुढे गेले आहेत."ते पुढे म्हणाले, "आपल्या विषयापुरते आणि मर्यादेत राहून बोलावे. योगदान देता आले नाही तरी हरकत नाही, मात्र अहंकाराची भाषा करू नये," असा पलटवार प्रवीण दरेकर यांनी केला.




