महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; न्यायालयाचा मोठा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) : महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांच्या प्रकरणात दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने भाजप नेते आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या सुनावणीवेळी बृजभूषण शरण सिंह आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी सचिव विनोद तोमर न्यायालयात उपस्थित होते. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 2 जुलै 2026 रोजी निकाल राखून ठेवला होता.

हे प्रकरण जानेवारी 2023 मध्ये समोर आले होते. त्यानंतर तब्बल 1,133 दिवसांत 127 सुनावण्या झाल्या. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्वनी पनवार यांनी हा निकाल दिला. बृजभूषण शरण सिंह 20 जुलै 2023 पासून नियमित जामिनावर होते, तर 10 मे 2024 रोजी त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.
निर्णयानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, न्यायालयाने आमची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. मी आधीही म्हटले होते की, एकही आरोप सिद्ध झाला तर कोणतीही शिक्षा स्वीकारेन. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर अधिक बोलेन.
मे 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. सहा महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. नंतर एका अल्पवयीन तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतली आणि जबाबही बदलला. आरोप निश्चितीच्या सुनावणीदरम्यान बृजभूषण यांनी हे सर्व आरोप खोटे आणि हेतुपुरस्सर असल्याचा दावा केला होता.
या प्रकरणात सहा महिला कुस्तीपटूंनी विविध स्पर्धांदरम्यान अयोग्य स्पर्श, जबरदस्तीने मिठी मारणे, छाती, पोट आणि शरीराच्या इतर भागांना स्पर्श करणे, तसेच लैंगिक स्वरूपाच्या मागण्या केल्याचे गंभीर आरोप केले होते. मात्र, न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींचा विचार करून बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली.




