सोनम वांगचुकांना रुग्णालयात हलवल्यानंतर अभिजीत दिपके आमरण उपोषणावर; 20 जुलैला मोर्चा
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणावर असलेल्या पर्यावरणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाला नवं वळण मिळालं आहे. या कारवाईनंतर 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्वतः आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली असून, 20 जुलै रोजी मोर्चाही काढण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दिपके यांनी म्हटलं, "सोनम वांगचुक यांना इथून हलवल्याने आंदोलन थांबणार नाही. आजपासून मी आमरण उपोषण सुरू करत आहे आणि 20 जुलैचा मोर्चाही नियोजनाप्रमाणे निघेल." यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. तसेच, पोलिसांकडून मारहाण आणि गैरवर्तन झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वांगचुक यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून उपोषणावर होते. डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून, दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे सांगितले आहे.
या घटनेनंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 20 जुलैच्या प्रस्तावित मोर्चाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




