मग त्यालाच आमदार करा! जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभेच्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सभागृहात बोलताना त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत, "मग त्यालाच आमदार घोषित करून टाका," असा संतप्त सवाल उपस्थित केला.

आव्हाड म्हणाले की, मुंब्रा परिसरातील एका पोलीस अधिकाऱ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव प्रलंबित असतानाही त्याची क्राइम युनिट-१च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. राजकीय पाठबळामुळे त्या अधिकाऱ्याला संरक्षण मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
याच अधिकाऱ्याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, पॉक्सो आणि विनयभंगाचे आरोप लावले, तसेच मला धमकावण्याचाही प्रयत्न केला, असा दावा आव्हाड यांनी सभागृहात केला. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच महत्त्वाची जबाबदारी दिली जात असल्याने लोकशाहीची मूल्ये धोक्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका दलित कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत, अद्याप आरोपींना अटक का झाली नाही, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.
तसेच, मुंबईतील गोळीबाराच्या घटनांवरूनही त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आणि गुन्हेगारी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला.राज्यात बेपत्ता होणाऱ्या लहान मुलांच्या वाढत्या संख्येचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याची मागणी करत, मुलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.
याशिवाय, अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षाला पुरेसा वेळ दिला जात नसल्याची नाराजी व्यक्त करत, आपल्या सरकारच्या काळात विरोधकांच्या मतांना योग्य संधी दिली जात होती, असा दावाही आव्हाड यांनी केला.दरम्यान, आव्हाड यांच्या आरोपांवर सरकार किंवा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.




