ओमराजेंचं बंड आधीच ठरलं होतं? भावाचा मोठा गौप्यस्फोट, ठाकरे गटात खळबळ

ओमराजेंचं बंड आधीच ठरलं होतं? भावाचा मोठा गौप्यस्फोट, ठाकरे गटात खळबळ

मुंबई (प्रतिनिधी) : धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या निर्णयावर आता घरातूनच विरोध सुरू झाला आहे. ओमराजे यांचे चुलत बंधू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांनी मोठा गौप्यस्फोट करत, ओमराजेंचे पक्षांतर हे अचानक घेतलेलं पाऊल नसून त्याचं महिनाभरापासून नियोजन सुरू असल्याचा दावा केला आहे.

मकरंद राजेंच्या म्हणण्यानुसार, पक्षांतराबाबत ओमराजे यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. 2029 मध्येही विजय मिळवता येईल, पक्ष बदलण्याची गरज नाही, असं समजावण्याचा प्रयत्न केला. पण ओमराजेंनी स्वतःचा निर्णय कायम ठेवला, असं त्यांनी सांगितलं.इतकंच नाही तर पक्षाने आदेश दिल्यास ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावर उतरायलाही आपण तयार असल्याचा इशारा मकरंद राजेंनी दिला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे एकत्र राजकारण करणारे दोन भाऊ आता वेगवेगळ्या राजकीय मार्गांवर उभे ठाकल्याचं चित्र दिसत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याची तयारी सुरू असून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाणार असल्याचं मकरंद राजेंनी स्पष्ट केलं. ओमराजे यांनी पक्ष सोडला असला तरी शिवसैनिकांची ताकद आणि पाठिंबा ठाकरे गटासोबतच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दुसरीकडे, महायुतीकडून ओमराजे निंबाळकर यांचं स्वागत करण्यात आलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी विकासासाठी ओमराजे महायुतीत आले असतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करू, अशी भूमिका मांडली आहे.यामुळे धाराशिवच्या राजकारणात आता "भाऊ विरुद्ध भाऊ" अशी रंगतदार राजकीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.