मंत्र-तंत्राच्या नावाखाली महिलेची फसवणूक; विरारमध्ये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, पोलिसांचा तपास सुरू
मुंबई (प्रतिनिधी) : विरार परिसरातून अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलेचे कथित लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आजारी अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करून तो बरा होईल, असे आमिष दाखवत एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय कमलाकर राऊत याने पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. मुलाच्या उपचाराच्या बहाण्याने तिला अर्नाळा परिसरातील एका रिसॉर्टमध्ये नेण्यात आले. तेथे तिच्या संमतीविना लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तपासादरम्यान अजय राणा नावाच्या एका तथाकथित मांत्रिकाचे नावही समोर आले आहे. आरोपीने या व्यक्तीकडे मंत्र-तंत्राद्वारे उपचार केले जात असल्याचे सांगून पीडित महिलेला त्याच्याशी संपर्क करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीविरोधात यापूर्वीही एका वेगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली असून, त्या संदर्भातही पोलीस पडताळणी करत आहेत.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली आणखी कोणाची फसवणूक किंवा शोषण झाले आहे का, तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. या घटनेनंतर अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीविरोधात कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.




