अमित शाहांवरील राहुल गांधींच्या आरोपांवरून लोकसभेत गदारोळ; रिजिजूंच्या आक्षेपानंतर अखिलेश यादव मैदानात
मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026 वरील चर्चेदरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत, आंदोलक विद्यार्थ्यांवर पेलेट गन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांकडून देण्यात आल्याचा दावा केला. या वक्तव्यानंतर लोकसभेत एकच गदारोळ उडाला.

राहुल गांधींच्या आरोपांवर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप घेत, अशा गंभीर आरोपांसाठी पुरावे सादर करण्याची मागणी केली. राहुल गांधी हे कोणत्या आधारावर बोलत आहेत? त्यांच्याकडे आदेशाची प्रत असेल तर ती दाखवावी, अन्यथा सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी रिजिजू यांनी केली. त्यांच्या या भूमिकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.
याचवेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राहुल गांधींची बाजू घेत सरकारला सवाल केला. ते म्हणाले, जर विरोधी पक्षनेत्यांनी गंभीर आरोप केले असतील, तर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि कारवाई नेमकी कोणाच्या आदेशाने झाली, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी सरकारची आहे.
अखिलेश यादव यांच्या वक्तव्याला उत्तर देताना किरेन रिजिजू म्हणाले, चौकशीची मागणी असेल तर त्यावर चर्चा होऊ शकते. मात्र राहुल गांधी यांनी जे आरोप केले, ते पुराव्याशिवाय आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अमित शाह यांच्यावर आणखी टीका करत म्हटले की, देशाच्या तथाकथित गृहमंत्र्यांमध्ये सभागृहात येऊन बसण्याचेही धाडस नाही. मी त्यांचा ताफा पाहिला, त्यात 30 वाहने होती. ते स्पष्टपणे घाबरलेले दिसत होते. यावेळी लोकसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करत, चर्चेचा विषय गृह मंत्रालय नसून संबंधित विधेयक असल्याची आठवण करून दिली.
त्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा विद्यार्थ्यांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित करत, पेलेट गन आणि इतर बळाचा वापर गृहमंत्र्यांच्या आदेशानेच झाला असल्याचा आरोप केला. यावर पुन्हा एकदा किरेन रिजिजू यांनी पुरावे मागितले आणि सभागृहात सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार गदारोळ आणि घोषणाबाजी पाहायला मिळाली.




