HSC Exam Result : दुखा:चा डोंगर कोसळला, परिक्षा दिली ... वैभवी देशमुखचे 12 वी परिक्षेत मोठे यश

Vaibhavi Deshmukh HSC Exam Result: बारावीचा आज निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये मस्साजोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखनेही मोठे यश मिळवले आहे. वडिलांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रभर आंदोलन करणाऱ्या वैभवी देशमुखने बारावीमध्ये मोठे यश संपादन करून तब्बल 85.33 टक्के गुण मिळवले आहेत.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण देशभर गाजले. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकीय तसेच सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. या भयंकर हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येने कुटुंबीय हादरले असतानाच त्यांची कन्या वैभवी देशमुख बारावीची परीक्षा देत होती. त्यामुळे तिच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
बारावीच्या परीक्षेत वैभवी देशमुखने 85.33 टक्के इतके मार्क्स मिळवलेत. वडिलांच्या मृत्यूचे आभाळाएवढं दुःख घेऊन वैभवीने परीक्षा दिली. या परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन केले. या निकालानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की तिचा अभ्यासात मनच लागत नाही. पावलोपावली आपल्या वडिलांची आठवण येते. मात्र आधी मला या कठीण परिस्थितीमध्ये देखील परीक्षा द्यायची आहे आणि नीट देखील पास करायची आहे असे म्हटले होते. त्याचीच प्रचिती म्हणून आज बारावीच्या परीक्षेत तिने यश संपादन केले आहे.
वडिलांच्या प्रतिमेचे घेतले दर्शन
या परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. यात इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत. या निकालानंतर तिने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.