अशोक खरातकडून अघोरी पूजा करुन घेतली ;चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं

अशोक खरातकडून अघोरी पूजा करुन घेतली ;चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर सध्याच्या मंत्रिमंडळातील एक डझन मंत्री तुरुंगात जातील, असा स्फोटक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या अघोरी उद्योगांची कुणकुण काही महिन्यांपूर्वीच लागली होती. अखेर हे अघोरी उद्योग खूपच वाढल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात याच्यावर कारवाईचा बडगा उगारला, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये याबाबत भाष्य केले आहे. 

सरकारने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील. अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2018 साली 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोंदू बाबाचे कारनामे सहा महिन्यांपासून माहित होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती. पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदू बाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरु केली. भोंदू बाबाच्या निमित्ताने ते आता मित्र पक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत, असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी अशोक खराने पाच नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी अशोक खरातची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्याची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली होती.