राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा; हर्षवर्धन सपकाळ संतापले
मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थीनीने आपल्या समस्या आणि आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, दुर्गम भागातील गाव-खेड्यांतून आलेले विद्यार्थी दान मागत नाहीत, तर त्यांचा अधिकार मागत आहेत, असे म्हटले होते. तसेच, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.

आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला भेट देत आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट घेतली. गेल्या तीन दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, तीन विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. यावेळी सपकाळ यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.
गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, सेंट्रल किचन योजना बंद करावी, आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांच्या मागण्यांवरून हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपयांची मदत मिळावी, तसेच 5 ऑगस्ट 2026 रोजीचा सुधारित जीआर रद्द करावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
“आदिवासींच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी याआधीच पाठिंबा दिला आहे. एक विद्यार्थीनी राहुल गांधी यांना भेटली, हे अख्ख्या जगाने पाहिलं आहे. दोन वर्षांत 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. आदिवासी विभागात गलथान कारभार सुरू आहे. याला जबाबदार असणारे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.“या विषयावर स्वतंत्र कॅबिनेट बैठक घेतली पाहिजे, ही आमची भूमिका आहे,” असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावरूनही हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली. “मोदी सरकारच्या 12 वर्षांत साखरही कडू झाली आहे. साखरेचे दर 50 रुपयांवरून 100 रुपयांवर गेले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांवर गेले, तर गॅस सिलेंडरचे दर 400 रुपयांवर गेले आहेत. देशात होणारा भ्रष्टाचार याला कारणीभूत आहे,” असा आरोप सपकाळ यांनी केला.मोदी सरकार आपल्या काही ठराविक व्यापाऱ्यांचे चांगले व्हावे, यासाठी धोरणे ठरवत असल्याची टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.




