माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; ‘पेटा’चं राज्य सरकारला पत्र, नांदणी मठात परत आणण्याच्या हालचालींना विरोध
मुंबई (प्रतिनिधी) : माधुरी हत्तीणीच्या घरवापसीची चर्चा सुरू असतानाच ‘पेटा’कडून पुन्हा एकदा राज्य सरकारला पत्र लिहिण्यात आलं आहे. माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवण्यात यावं, अशी मागणी ‘पेटा’कडून करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून माधुरी हत्तीणीच्या नांदणी मठातील घरवापसीची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, यासंदर्भात उच्चस्तरीय समितीसमोरही सुनावणी पूर्ण झाली आहे. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता माधुरीला वनतारामध्येच ठेवण्यासाठी ‘पेटा’कडून राज्य सरकारला पत्र देण्यात आलं आहे.

दुसरीकडे, हत्तीणीच्या घरवापसीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी यासंदर्भात पोस्ट केली आहे. “पैशाने तुम्ही साम्राज्य विकत घेऊ शकता, पण जनतेच्या काळजातील प्रेम कधीच नाही. लवकरच आपली माधुरी पुन्हा नांदणी मठात दिसेल आणि तिचा आवाज आपल्या मातीत गुंजेल,” असं त्यांनी म्हटलं आहे. राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, पैशाने विकली गेली नव्हती ती निष्ठा आणि ती नाती. अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. त्या काळरात्री जेव्हा तिला आपल्यापासून हिरावून नेलं गेलं, तेव्हा फक्त नांदणी मठ नाही, तर अख्खं कोल्हापूर ढसाढसा रडलं होतं. काळजावर जणू दगडच ठेवला गेला होता.
एका गर्भश्रीमंत उद्योगपतीच्या बालहट्टासाठी आमची 450 वर्षांची संस्कृती, परंपरा आणि वारसा पायदळी तुडवला गेला. शासन, यंत्रणा आणि सर्वोच्च न्यायालयाला हाताशी धरून नांदणी मठातील आमची लाडकी ‘माधुरी’ हत्तीण गुजरातमधील वनतारा येथे नेली गेली. माधुरीला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. 35 वर्षे जिने आपल्याला पोटच्या पोरासारखा लळा लावला, ती एका क्षणात आपल्याच घरातून परकी झाली होती. ते पुढे म्हणाले की, हा लढा अजिबात सोपा नव्हता. एका बाजूला अफाट पैसा आणि सत्ता होती, तर दुसऱ्या बाजूला केवळ न्याय आणि अथांग प्रेम होतं. मग उभा राहिला तो डोळ्यांत पाणी आणि मनात आग असलेला अभूतपूर्व जनआक्रोश आणि 45 किलोमीटरची ती ऐतिहासिक पायी पदयात्रा.
नांदणी ते कोल्हापूरपर्यंतचे रस्ते माणसांनी ओसंडून वाहत होते. पायाला फोड आले तरी कोणी थांबायला तयार नव्हतं. कडक ऊन आणि घरात निरंकार उपवास असतानाही केवळ ‘माधुरी परत यावी’ म्हणून शेकडो माता-भगिनी रस्त्यावर चालत होत्या. त्यांच्या प्रत्येक अश्रूने या अन्यायाविरुद्ध साक्ष दिली. गावागावातील तरुणांपासून ते देशातील सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर्सपर्यंत प्रत्येकाने आपल्या लेखणीतून आणि व्हिडिओमधून यंत्रणेला जाब विचारला. देशभरात एकच आवाज घुमला. अखेर जनशक्तीच्या अथांग सागरापुढे सर्वोच्च न्यायालयालाही झुकावं लागलं.
ज्या सर्वोच्च न्यायालयाने तिला घेऊन जाण्याचा निर्णय दिला होता, त्याच न्यायालयाने लोकांच्या डोळ्यांतील पाणी, त्यांच्या भावना आणि जमिनीवरील वस्तुस्थिती पाहिली. लोकांच्या भावनांचा आदर करत न्यायालयाने पुनर्विचार केला. त्यानंतर हाय पॉवर कमिटीने तज्ज्ञांच्या समितीद्वारे नांदणी मठातील सर्व सोयी-सुविधांची बारकाईने पाहणी केली. आणि अखेर आज तो सुवर्णक्षण आला. हाय पॉवर कमिटीने माधुरीच्या परतीसाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे.
अडचणी अनेक आल्या, संकटांचे डोंगर उभे केले गेले. मात्र, कोट्यवधी लोकांची इच्छाशक्ती त्या सर्व अडचणींपेक्षा मोठी होती. वेळोवेळी झालेली आंदोलनं, न्यायालयीन लढा आणि लोकांचा अथांग पाठपुरावा यामुळेच ही अशक्य वाटणारी गोष्ट आज प्रत्यक्षात आली आहे. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नाही. हा विजय प्रत्येक त्या हाताचा आहे, ज्याने माधुरीसाठी पाटी पकडली. त्या माता-भगिनींचा आहे, ज्यांनी निरंकार उपवास असतानाही पाण्याचा थेंब न घेता 45 किलोमीटरची पायपीट केली. त्या प्रत्येक पावलांचा आहे, जे माधुरीसाठी रस्त्यावर चालले.
माननीय सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी, राज्य सरकार, तज्ज्ञ कमिटी, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर्स, सामाजिक संघटना आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या लढ्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात मावळ्यांचे मनापासून आभार.“पैशाने तुम्ही साम्राज्य विकत घेऊ शकता, पण जनतेच्या काळजातील प्रेम कधीच नाही! लवकरच आपली माधुरी पुन्हा नांदणी मठात दिसेल आणि तिचा आवाज आपल्या मातीत गुंजेल!”




