बारामतीतील सांगता सभेत छगन भुजबळ बोलताना सुप्रिया सुळेंची एंन्ट्री झाल्यानंतर दादांच्या नावानं घोषणा

बारामतीतील सांगता सभेत छगन भुजबळ बोलताना सुप्रिया सुळेंची एंन्ट्री झाल्यानंतर दादांच्या नावानं घोषणा

बारामती (प्रतिनिधी) : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  निधनानंतर बारामतीमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांनी बारामती आपापल्या स्तरावर प्रचार केल्यानंतर आज मंगळवारी दि. 21 रोजी याठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडणार आहे. सभेसाठी मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित आहेत. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे हेही उपस्थित आहेत. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मतदारांना सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडीमधील पुढऱ्यांनी क्षणाचा ही विलंब करता सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्षांना देखील पाठिंबा घ्यायला सांगितला, त्याबद्दल सर्वांचे आभार. अन्य उमेदवारांनी देखील सुनेत्रा पवारांना बिनशर्त पाठिंबा दिला पाहिजे होता. घराचा आधार हरवला तरी घर अजून उभं आहे, हातात हात घेऊन. बारामतीकरांना वाटेल सुनेत्राताई निवडून येणारच आहेत, एकमताने काय फरक पडेल. मात्र असं चालणार नाही. एक एक मत महत्त्वाचं आहे. आपल्याला ताईंसोबत खंबीरपणे उभा राहायचं आहे. दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करतायेत, असंही पुढे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, या देशात अनेक महिला मुख्यमंत्री झाल्या. उपमुख्यमंत्री झाल्या. राष्ट्रपती झाल्या. पंतप्रधान झाल्यात. तसंच ताईंना सुद्धा तुम्ही फक्त राज्यात नाही तर देशाच्या नेत्या म्हणून निवडून देणार देणार आहात, म्हणून आपल्याला मतदान करणे महत्त्वाचे आहे. एक सक्षम महिला म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणूनच नाही तर देशात सुद्धा सुनेत्राताईंचं नाव असेल. तुमचं दुःख अडचण समजून घेण्याइतकी संवेदनशीलता त्यांच्यामध्ये आहे. भविष्यातील महिला नेत्या म्हणून सुनेत्रा पवार असणार आहेत. बारामतीला देशाच्या नकाशावर आणखी उंचीवर न्यायचं आहे. तुमच्याशिवाय बारामतीची ओळख पूर्ण होऊच शकत नाही, असंही पुढे भुजबळ म्हणालेत. 

 भुजबळांचं भाषण सुरू असतानाच मंचावर सुप्रिया सुळेंचं आगमन झालं, त्यावेळी भुजबळांनी सुप्रियाताईंचं स्वागत केलं, संपूर्ण लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. सुप्रिया सुळे स्टेजकडे येताना अजित पवारांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणाणला. त्याचवेळी भुजबळ पुढे म्हणाले की, त्यांनी तर आधीच उमेदवार देणार नसल्याचं जाहीर करत पाठिंबा दिला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीने देखील सुनेत्राताईंना पाठिंबा दिला. अश्रू पुसायचे आहेत आणि सुनेत्रा ताई यांना निवडून आणण्याचा निर्धार करायचा आहे, असंही पुढे भुजबळ म्हणालेत.