पूरात मदत नाही, आता हेल्मेटवर कारवाई; तुळींज पोलिसांच्या दंड मोहिमेवर वसई-विरारकरांचा संताप
मुंबई (प्रतिनिधी) : वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अनेक भाग जलमय झाले, घरांमध्ये पाणी शिरले, हजारो वाहने बंद पडली आणि नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. पूरस्थितीमुळे अनेक दिवस अडकून पडलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा होती. मात्र, परिस्थिती काहीशी सुरळीत होताच तुळींज पोलिस आणि वाहतूक शाखेने विना हेल्मेट दुचाकी चालकांविरोधात कारवाई सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नालासोपारा पूर्वेतील तुळींज परिसरात वसई वाहतूक शाखा आणि तुळींज पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून दंड आकारण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान अनेक वाहनचालकांनी आपली वाहने पावसात बंद पडल्याने ती गॅरेजमध्ये नेण्यासाठी किंवा दुरुस्त करून घरी आणण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणाकडे दुर्लक्ष करून दंड आकारण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पूराच्या काळात रस्त्यांवर साचलेले पाणी, वाहतूक कोंडी, वीजपुरवठा खंडित होणे, घरांमध्ये घुसलेले पाणी आणि मदतीसाठी होत असलेला आक्रोश याकडे प्रशासनाने अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. “पूराच्या दिवसांत आम्हाला मदतीची गरज होती, तेव्हा यंत्रणा दिसली नाही. पण संकट संपताच दंडाची वही घेऊन अधिकारी रस्त्यावर उतरले,”अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली.
वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मान्य करतानाच, नैसर्गिक आपत्तीतून सावरत असलेल्या नागरिकांवर अशा वेळेस दंडात्मक कारवाई करणे कितपत योग्य आणि संवेदनशील आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. “संकटात आधार नाही, पण दंडासाठी यंत्रणा कायम तत्पर,” अशी उपरोधिक चर्चाही आता वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात रंगू लागली आहे.
गेल्या पाच दिवसांच्या मुसळधार पावसाने वसई-विरारकरांचे आयुष्य अक्षरशः विस्कळीत करून टाकले. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने फर्निचर, धान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आजही अनेक सोसायट्यांच्या परिसरात भिजलेले सोफे, पलंग, गाद्या आणि खराब झालेल्या वस्तूंचे ढीग दिसून येत असून, ते नुकत्याच ओढवलेल्या संकटाची साक्ष देत आहेत.
सलग अनेक दिवस वीजपुरवठा खंडित होता. मोबाईल नेटवर्क नसल्याने नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला होता. रस्ते पाण्याखाली गेल्याने बाहेर पडणे अशक्य झाले होते. अंधार, भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणात हजारो कुटुंबांनी दिवस काढले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हा काळ अत्यंत वेदनादायी ठरल्याचे स्थानिकांनी सांगितले.
आता पाणी ओसरले असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, पुरामुळे झालेल्या आर्थिक आणि मानसिक नुकसानीतून अनेक कुटुंबे अद्याप सावरलेली नाहीत. अशा परिस्थितीत प्रशासनाने प्रथम नागरिकांच्या पुनर्वसनाला आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याला प्राधान्य द्यावे, त्यानंतरच दंडात्मक मोहिमा राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.




