केशवराव भोसले नाट्यगृहात स्वच्छता आणि वर्कशॉप कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतरचा पहिलाच कार्यक्रम महापालिकेच्या खऱ्या नायकांसाठी आयोजित करण्यात आला. महापालिकेच्या स्वच्छता व वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम येथे मोठ्या दिमाखात पार पडला. महापौर सौ. रुपाराणी निकम व महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २९ स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी ‘नमस्ते योजने’अंतर्गत कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले, तर लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ३ नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश सुपूर्द करण्यात आले.
वर्कशॉप विभागातील १२ कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव
अनेक वर्षांपासून बंद असलेली जुनी वाहने व स्क्रॅपमधील चार ट्रक अतिक्रमण कारवाईसाठी पुन्हा तयार करणे, तसेच जुना जेसीबी दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या वर्कशॉप विभागातील १२ कर्मचारी व सुपरवायझरांचाही या वेळी विशेष गौरव करण्यात आला.
‘शहर स्वच्छ ठेवणारे आपले खरे दूत’ – महापौर रुपाराणी निकम
"संपूर्ण शहर झोपेत असताना महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता कामाला सुरुवात करतात. नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर पहिलाच कार्यक्रम या स्वच्छता दूतांच्या सन्मानासाठी होत असल्याचा विशेष आनंद आहे."
महापौर पुढे म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी दरमहा ३,५०० रुपये शिष्यवृत्ती योजना, तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याबाबत नियोजन केले जाईल. प्रलंबित प्रश्नांवर लवकरच बैठक घेऊन ते मार्गी लावले जातील.
‘राजर्षी शाहूंच्या विचारांना शोभणारा क्षण’ – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
"राजर्षी शाहू महाराजांनी कधीही जात-पात किंवा उच्च-नीच असा भेद केला नाही. काम हे काम असते आणि प्रत्येक कामाचा सन्मान झाला पाहिजे. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहात या कर्मचाऱ्यांचा सत्कार होणे हा ऐतिहासिक क्षण आहे."
आयुक्तांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांत ६७ कर्मचाऱ्यांना लाड-पागे योजनेंतर्गत नियुक्त्या देण्यात आल्या असून पदवीधर कर्मचाऱ्यांना लिपिक पदावर बढती दिली आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांचे कापड व गमबुटांचे वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण सभापती सौ. कौसर बागवान, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, कामगार अधिकारी राम काटकर, वर्षा जोशी यांच्यासह महापालिकेचे विविध अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




