नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत नवा ट्विस्ट; 'सिंहस्थ कुंभपर्व' पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा 'पालकमंत्री' म्हणून उल्लेख
नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना आणि सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांमध्ये चढाओढ सुरू असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘सिंहस्थ कुंभपर्व’ माहिती पुस्तिकेत मंत्री गिरीश महाजन यांच्या छायाचित्राखाली थेट ‘पालकमंत्री व कुंभपर्व मंत्री’ असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

पालकमंत्रिपदाची स्थगिती अन् नवा वाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार जानेवारी महिन्यात नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र, या पदासाठी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते दादा भुसे देखील इच्छुक असल्याने महायुतीत नाराजीचे नाट्य रंगले होते. वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. सध्या या पदाबाबत कोणताही अधिकृत शासकीय निर्णय झालेला नसताना, थेट शासकीय पुस्तिकेत महाजन यांचा ‘पालकमंत्री’ असा उल्लेख आल्याने महायुतीतील अंतर्गत वादाची ठिणगी पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुस्तिकेवर दिग्गजांचे फोटो
प्रसिद्ध करण्यात आलेल्या या 'सिंहस्थ कुंभपर्व' पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून झालेला हा उल्लेख निव्वळ छपाईतील चूक आहे की आगामी काळातील राजकीय निर्णयाचे संकेत? असा सवाल राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केला जात आहे. आता या वादावर राज्य सरकार तसेच संबंधित प्रशासन काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




