आकनूर स्मशानभूमीत अमावस्या - पौर्णिमेला होतोय अघोरी प्रकार ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

आकनूर स्मशानभूमीत अमावस्या - पौर्णिमेला होतोय अघोरी प्रकार ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

राधानगरी (स्वप्नील कांबळे) - राधानगरी तालुक्यातील आकनूर येथील स्मशानभूमीत अमावस्या आणि पौर्णिमेनंतरच्या दिवशी अघोरी कृत्ये आढळून येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. काही दिवसांपासून ग्रामस्थांना संशयास्पद हालचाली जाणवत असल्या तरीही, पाहिलेल्या अघोरी प्रकारानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आकनूर - मांगोली मुख्य रस्त्यालगत असलेली ही स्मशानभूमी पारंपरिक संस्कारांपुरती मर्यादित असते. मृत व्यक्तीचे दहन, राख विसर्जन आणि इतर विधी येथे नियमितपणे होत असतात. मात्र, अलीकडील काळात प्रत्येक अमावास्या व पौर्णिमेनंतरच्या सकाळी काही नागरिकांना अंधश्रद्धेच्या वस्तू, टाकलेल्या ठेवणी, ताईत, टाचण्या, हळदीकुंकू, काळे मंत्रोच्चाराचे चिन्ह अशा संशयास्पद गोष्टी आढळू लागल्या.

ग्रामस्थांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले; मात्र काल स्मशानभूमीत नारळावर काळी बाहूली, लाल दोऱ्याने बांधलेले ताईत, लिंबावर टाचण्या आणि हळद-कुंकूचे अवशेष आढळल्यानंतर गावात खळबळ उडाली.

स्थानिकांनी व्यक्त केलेल्या भावना आणखी गंभीर आहेत. काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे लोक अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, भीतीचे वातावरण निर्माण करणारे अघोरी विधी करीत असल्याची शंका ग्रामस्थांमध्ये वाढत आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात, “स्मशानभूमी ही पवित्र स्थळ. मृतांना शेवटचा मान देण्याची जागा. येथे असे अपवित्र, अघोरी कृत्य कोण करतंय याची चौकशी झाली पाहिजे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन जागरूकता बाळगली पाहिजे.”

स्थानिकांनी याबाबत ग्रामपंचायत, पोलीस पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. अशा कृत्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती, अंधश्रद्धेला खतपाणी आणि सामाजिक असुरक्षितता निर्माण होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.