'या' प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करा - शिवसेना महिला आघाडी
कोल्हापूर (प्रतिनिधी) - फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरात पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्यावर बलात्काराचा तसेच प्रशांत बनकर आणि इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. डॉ. मुंडे यांनी या संदर्भात तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल महाडीक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही आरोप समोर आले आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेतूनच अशा प्रकारचे आरोप होणे ही कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे. फलटण जिल्हा सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना देण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणात आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खा. रणजीत नाईक निंबालकर तसेच त्यांचे स्वीय सहायक राजेंद्र शिंदे आणि रोहित नागतिळे यांनी स्थानिक प्रशासनावर अनुचित दबाव आणल्याचे आरोप करण्यात आले आहेत. सत्तेचा आणि प्रशासकीय अधिकारांचा असा गैरवापर हा संविधान व कायद्याच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. सेवाकाळात डॉ. मुंडे या शवविच्छेदन व वैद्यकीय तपासणीच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना पोलिसांकडून काही आरोपींबाबत पक्षपाती प्रमाणपत्र देण्याचा दबाव आणला जात होता. वैद्यकीय नैतिकतेचा सन्मान राखून त्यांनी हा दबाव नाकारल्यावर त्यांच्यावर छळ वाढविण्यात आला होता. दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती तसेच माहिती अधिकाराखाली अर्जही दाखल केला होता. मात्र, कारवाई न झाल्याने परिस्थिती गंभीर होत गेली आणि अखेरीस त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. मुंडे यांच्या कुटुंबाने या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून तक्रारीकडे दुर्लक्ष, शवविच्छेदनात झालेला विलंब आणि प्राथमिक चौकशीत निष्पक्षतेचा अभाव या गोष्टींमुळे चौकशीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर समाजमाध्यमांवर डॉ. मुंडे यांचे चरित्रहनन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे. या सर्व घटनांमुळे केवळ औपचारिक चौकशी न करता स्वतंत्र आणि उच्चस्तरीय तपास यंत्रणेकडून निष्पक्ष, सखोल आणि वेळेत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात कोणत्याही महिला अधिकारीला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यावेळी स्मिता सावंत, अनिता ठोंबरे, रिमा देशपांडे, अमृता जाधव, विद्या गायकवाड, शुभांगी साळोखे उपस्थित होत्या.




