तळसंदे वसतिगृहात विद्यार्थ्याला मारहाण ; रेक्टरविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूर (प्रतिनिधी) - हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील एका वसतिगृहात विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी रेक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

उचगाव येथील श्रीरामनगर येथील रहिवासी सिद्धिविनायक सनी मोहिते (इ. १० वी) हा तळसंदे येथील श्री. शामराव पाटील व अनिवासी शिक्षण संस्था संकुलातील वसतिगृहात राहत होता. सोमवारी ( ६ ऑक्टोबर) त्याचे वर्गातील विद्यार्थी पृथ्वीराज कुंभार याच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. यावेळी रेक्टर राहुल कोळी यांनी दोघांनाही समज दिली होती.
मात्र, मंगळवारी (७ ऑक्टोबर) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास, पी.टी. परेडदरम्यान, रेक्टर राहुल कोळी यांनी भांडणाच्या रागातून सिद्धिविनायक मोहितेला स्टेजवर नेऊन पीव्हीसी पाइपने त्याच्या पाठीवर व डोक्यावर मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून संबंधित रेक्टरवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. याप्रकरणी सिद्धिविनायकच्या वडिलांनी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, रेक्टर राहुल कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.




