महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती, विरोधकांकडून विशेष अधिवेशनाची मागणी

महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती, विरोधकांकडून विशेष अधिवेशनाची मागणी

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक भागांत गंभीर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाची सुमारे 16 टक्क्यांपर्यंत तूट निर्माण झाली आहे. गेल्या 40 ते 50 दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. मराठवाडा, विदर्भ, नगर आणि पुणे जिल्ह्यांसह अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडला आहे. अशामध्ये आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत.


शरद पवारांनी केल्या 9 मोठ्या मागण्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनच आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची आणि 9 प्रमुख मागण्यांद्वारे मदतीची साद घातली आहे. अधिकृत निकषांची वाट न पाहता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान 50 हजार रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना 25 हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, तसेच नवीन पीक कर्ज आणि संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विरोधकांनी केली विशेष अधिवेशनाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी महायुती सरकारकडे पुढील 10 दिवसांत दुष्काळासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची आग्रही मागणी केली. राज्यात पाऊस कमी झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये आणि मजुरांना 25 हजार रुपयांची मदत द्यावी, असे त्यांनी म्हटले. “राज्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असली तरी सरकारला मात्र कुठलेही गांभीर्य नाही. राज्य शासनाने या भयावह संकटाची गंभीर दखल घेत तातडीने विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळावर विस्तृत चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “800 हून अधिक गावे पाण्याच्या टंचाईचा सामना करत आहेत. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू केले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्यापेक्षा आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती समजून घ्यावी. शेतकरी मरत असताना सरकारला दुष्काळ जाहीर करण्यासाठी कसले नियम अडवत आहेत?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. रोहित पवारांच्या मागणीला पाठिंबा देत त्यांनी दुष्काळाच्या आणि शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, अशी मागणी केली आहे.