भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचाराचा शनिवारी शुभारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी) - महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता प्रत्यक्षात सुरू झाली असून सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात होणार आहे.

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आ. रवींद्र चव्हाण यांचा हा पहिलाच कोल्हापूर दौरा असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भव्य स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्यामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठा वेग मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. नियोजित कार्यक्रमानुसार महायुतीचे सर्व उमेदवार साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात येणार असून, आ. रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन होणार आहे.
हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. तसेच या दौऱ्यातून कोल्हापूरसाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




