राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई! गोवा बनावट विदेशी दारूच्या २५ बॉक्ससह १० लाखांचा मुद्देमाल जप्त!

राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई! गोवा बनावट विदेशी दारूच्या २५ बॉक्ससह १० लाखांचा मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर/ प्रतिनिधी :  गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वाहतुकीविरोधात एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. नेसरी-अडकूर रस्त्यावर गोवा बनावट दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत तब्बल १० लाख ५३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, बोळुर्डी बसथांब्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला होता. संशयास्पद वाटणाऱ्या एका सिल्व्हर रंगाच्या 'टाटा सुमो गोल्ड' (GA-०७-E-५५२०) या गाड्याची तपासणी केली असता, त्यात गोवा बनावट विदेशी दारूचे विविध ब्रँडचे एकूण २५ बॉक्स आढळून आले.

या कारवाईत २ लाख ५३ हजार ४४० रुपयांची दारू आणि सुमारे ८ लाख रुपये किमतीची टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी वाहनाचा चालक अमोल नंदकुमार सावंत याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे अधीक्षक, उपअधीक्षक आणि गडहिंग्लजचे निरीक्षक प्रमोद खरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर. सी. केरीपाळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक केरीपाळे करत आहेत.