डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात 'सायबर वॉरियर्स क्लब'ची स्थापना ; सायबर सुरक्षेसाठी क्विक हील फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात 'सायबर वॉरियर्स क्लब'ची स्थापना ; सायबर सुरक्षेसाठी क्विक हील फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

कोल्हापूर/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल गोपनीयता आणि ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ आणि पुण्याच्या क्विक हील फाउंडेशन यांच्यात ऑनलाईन सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' या उपक्रमांतर्गत झालेल्या या करारामुळे विद्यापीठात 'सायबर वॉरियर्स क्लब'ची स्थापना करण्यात आली असून, यासाठी ४ क्लब ऑफिसर्स व २० सायबर वॉरियर्सची निवड करण्यात आली आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ परिसर, शाळा, महाविद्यालये आणि समाजात सायबर सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती केली जाईल. यासाठी विशेष मोहिमा, कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. २०२६-२७ या वर्षासाठी क्लबच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये शिवम गिरी (प्रेसिडेंट), साकीब सय्यद (सेक्रेटरी), नंदन गायकवाड (अॅक्टिव्हिटी डायरेक्टर) आणि ऋषिकेश खाडे (मीडिया डायरेक्टर) यांची निवड करण्यात आली आहे.

क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू असून, अजय शिर्के यांनी उपक्रमाची माहिती दिली, तर गायत्री केसकर आणि दिपू सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोलताना कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत म्हणाले की, विद्यार्थ्यांना बदलत्या डिजिटल जगासाठी सक्षम बनवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी सांगितले की, आजच्या युगात सायबर सुरक्षा ही प्रत्येकाची मूलभूत जबाबदारी असून यामुळे नैतिक डिजिटल नागरिक घडण्यास मदत होईल.

हा उपक्रम विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि प्र-कुलपती ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक समन्वयक अभिजित शिंदे व डॉ. विद्या बडदारे यांच्या समन्वयाने राबवला जात आहे.