आ. विनय कोरे यांच्या हस्ते कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू मोहिमेचा शुभारंभ

कोल्हापूर - राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा - २ अंतर्गत गावांगावांमध्ये स्वच्छतेच्या ज्या सोयी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्याचा ग्रामस्थांनी नियमित वापर करून आपले गाव कायमस्वरुपी स्वच्छ ठेवावे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी "कंपोस्ट खड्डा भरु, आपला गाव स्वच्छ ठेवू" हे अभियान 1 मे पासून 15 सप्टेंबर पर्यंत जिल्हयात राबविण्यात येत आहे. 1 मे ते 10 मे या कालावधीत हे कंपोस्ट खड्डे भरुन यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येणार आहे.
1 मे महाराष्ट्र दिना दिवशी या अभियानाचा शुभारंभ लोकप्रतिनिधीच्या हस्ते करुन, या अभियानात लोकसहभाग मिळविण्यात आला. कोल्हापूर जिल्हयात ग्रामपंचायत स्तरावर कंपोस्ट खड्डा भरू, आपल गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने आमदार डॉ. विनय कोरे (सावकर), यांच्या हस्ते ग्रामपंचायत बहिरेवाडी, ता. पन्हाळा व ग्रामपंचायत शिरगाव, ता. शाहुवाडी येथे कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा शुभारंभ केला.
हा शुभारंभ कार्यक्रम प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदचे सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ञ सल्लागार, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व गट संसाधन केंद्राचे कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी यांनी कामकाज पाहीले