गोडसाखर'च्या कामगारांची पावणेआठ कोटींची थकीत देणी अखेर पदरात; कर्मचारी युनियनकडून मंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार!

गोडसाखर'च्या कामगारांची पावणेआठ कोटींची थकीत देणी अखेर पदरात; कर्मचारी युनियनकडून मंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार!

गडहिंग्लज/प्रतिनिधी : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थकीत देण्यांचा प्रश्न अखेर पूर्णपणे निकालात निघाला आहे. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ग्रॅच्युइटी मिळवून दिल्याबद्दल कारखाना कर्मचारी युनियनच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार करण्यात आला.

कारखान्याकडून थकीत भविष्य निर्वाह निधीपोटी साडेपाच कोटी रुपये, २५ टक्के ग्रॅच्युइटीचे दीड कोटी रुपये आणि हंगामी कर्मचाऱ्यांचे रिटेन्शन ६५ लाख, असे एकूण ७ कोटी ७५ लाख (पावणे आठ कोटी) रुपये अदा करण्यात आल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणीकर यांनी या निर्णयाला ऐतिहासिक म्हटले असून, मुश्रीफ साहेबांनी नेहमी कामगारांच्या हिताची तळमळ दाखवली असल्याचे सांगितले.

कारखान्याला वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा - हसन मुश्रीफ:
या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी कारखान्याच्या आजवरच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, हा कारखाना अनेक वर्षे कर्जाच्या खाईत होता. त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी 'ब्रिक्स' कंपनीला तो चालवायला दिला होता. त्यांनी ८ वर्षे कारखाना चांगला चालवला, परंतु राजकीय तक्रारींमुळे त्यांना दोन वर्षे आधीच काम सोडावे लागले. सध्या कारखाना आर्थिक अडचणीत असून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने (KDCC) नियम बाजूला ठेवून कारखान्याला मोठी मदत केली आहे.

कामगारांना आवाहन करताना मुश्रीफ म्हणाले, "जरी आज तुम्ही माझा सत्कार केला असला, तरी जोपर्यंत आगामी गाळप हंगाम उत्तम प्रकारे पार पडत नाही, तोपर्यंत कारखान्यावरील संकट कायम राहील. हा कारखाना तुम्हाला भाकरी देणारी संस्था आहे. त्यामुळे सर्वांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून एकजुटीने आणि प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे." या कार्यक्रमाला युनियनचे पदाधिकारी, कारखान्याचे संचालक आणि मोठ्या संख्येने शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.