पंचगंगा नदीने सोडले पात्र! धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, कोल्हापुरात नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरकरांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी! कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेली पंचगंगा नदी चालू हंगामात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीने आपले पात्र सोडले आहे. सध्या पंचगंगा नदीची पातळी 30 फुटांवर पोहोचली आहे. तर जिल्यातील 36 बंधारे पाण्याखाली गेले आहे.

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. विशेषतः धरण क्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पसरल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, हंगामात पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर आल्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी नदी घाटावर एकच गर्दी केली आहे. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




