गोकुळ गीते यांची माघार; मात्र नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार का? प्रश्नावर उत्तर टाळत पत्रकार परिषदेतून निघाले

गोकुळ गीते यांची माघार; मात्र नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार का? प्रश्नावर उत्तर टाळत पत्रकार परिषदेतून निघाले

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक विधान परिषद निवडणुकीतील भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. मात्र, माघारीची घोषणा करताना घडलेल्या एका नाट्यमय प्रसंगाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या शेजारी बसून गोकुळ गीते यांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु, "तुम्ही माघार घेतली आहे, पण नरेंद्र दराडे यांना अधिकृत पाठिंबा देणार आहात का?" असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच त्यांनी कोणतेही उत्तर न देता पत्रकार परिषदेतून थेट बाहेर पडणे पसंत केले.यामुळे महायुतीतील मतभेद खरोखर मिटले आहेत की हा केवळ औपचारिक समेट आहे, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना गोकुळ गीते यांनी आपल्या नाराजीची कारणेही स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, ही जागा भाजपच्या माध्यमातून गणेश गीते यांना मिळेल, असा शब्द देण्यात आला होता. मात्र, जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर वातावरण बिघडले. १ जून रोजी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघार घेण्याबाबत अनेक स्तरांवरून संपर्क झाला होता, असेही त्यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. भविष्यात योग्य संधी आल्यास आमच्या भूमिकेचाही विचार केला जाईल, असे आश्वासन मिळाले आहे. मुंबईत वरिष्ठ नेत्यांसोबत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच माघारीचा निर्णय घेतल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. ‘गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय’ किंवा ‘बंडखोर’ अशा उल्लेखांमुळेही आपण माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी स्वतःवर झालेल्या विविध आरोपांनाही उत्तर दिले. "माझ्या उमेदवारीबाबत अनेक चर्चा झाल्या, सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, मी कोणताही घोडेबाजार केलेला नाही. मी स्वतः प्रचार थांबवला असून कार्यकर्त्यांनाही प्रचार थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही," असे ते म्हणाले.

दरम्यान, गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांनीही भावनिक प्रतिक्रिया दिली. "गोकुळचा माझ्यामुळे बळी गेला. राजकारणामुळे आमच्या कुटुंबात दुरावा निर्माण झाला. मी त्याला आज माझे ऐकण्यास सांगितले, पण यापुढे त्याचा मार्ग त्याने स्वतः ठरवावा. तो कोणत्या पक्षात जायचे किंवा कोणता निर्णय घ्यायचा हे आता पूर्णपणे त्याच्यावर आहे," असे गणेश गीते म्हणाले.

तसेच, "माझ्यावरील न्यायालयीन प्रकरणाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. राजकारण आणि व्यवसाय हे दोन वेगळे विषय आहेत. मी माझ्या नेत्यांनाही स्पष्ट सांगितले आहे की, यापुढे गोकुळ गीते यांच्याबाबत मला विचारू नये," असेही त्यांनी नमूद केले.मात्र, नरेंद्र दराडे यांना स्पष्ट पाठिंबा देणार का, या महत्त्वाच्या प्रश्नावर गोकुळ गीते यांनी मौन बाळगल्याने राजकीय चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे.